साथींनो,
मराठी साहित्यविश्वातील बहुचर्चित अन् प्रख्यात कवी नारायण सुर्वे यांना आपण सगळेच ओळखतो. मोरोपंत, बालकवी, माडगूळकर इ. कैक कवी सुद्धा आपणांस ज्ञात आहेतच. मग नारायण सुर्वेंचे असे काय वेगळेपण की त्यांना “क्रांतिकारी अभिवादन” अन् वरील इतरांचा फक्त नामोल्लेखच्? भा. रा. तांबेंच्या शब्दात म्हणायचे झाले तर, या सर्वांच्या कविता ‘त्यांच्या जीवनाच्या संगतीने वाढल्यात’ परंतु नारायण सुर्वेंची कविता जीवनाच्या संगतीने, जीवनाला घेऊन वाढली. चंद्र, तारे, फुले, हिरव्यागार लता, प्रेयसीच्या बटा इ. विषयात अडकलेल्या मराठी कवितेला खेचून माणसांत, कारखान्याच्या घामगाळ्या वातावरणात, कामगार-कष्टकऱ्यांच्या वस्तीत आणणाऱ्या जिवंत कवींमध्ये नारायण सुर्वे मोडतात. जन्मतः आई मरण पावल्यानंतर दत्तक घेणारे आईवडील कामगार असल्याने सुर्वेंनी कामगारवर्ग जवळून बघितला अन् त्याचा अभिमानही बाळगला. घरगडी, हॉटेलात कपबशा धुणे, हरकाम्या, दूध टाकणे, गोदरेज कारखान्यात पत्रे उचलणे, टाटा ऑइल मिलमध्ये हमाली करणे, गिरणीत धागा धरणे, मुंबई महापालिकेच्या शाळेत शिपाई म्हणून नोकरी करणे अशी “भाकरीचा चंद्र” मिळवण्यासाठीची कामे करता-करताच 1961 मध्ये ते शिपायाचे शिक्षकही झाले. महापालिकेच्या शाळेत त्यांची शिक्षक म्हणून नोकरी सुरू झाली. ते तेव्हापासून गिरणगावचे “सुर्वे मास्तर” झाले. गिरणी कामगारांचे संप, आंदोलने इत्यादी मध्ये धडाडीने भाग घेत कामगार-वर्गाचे ज्वलंत प्रश्न बघता-बघताच त्यांना “मार्क्स बाबा” भेटला. एक कार्यकर्ता म्हणून लालबागच्या चाळीत सभा भरवणे, कामगारांना त्याची माहिती देणे, कामगारवर्गीय दृष्टिकोणाचा प्रचार-प्रसार करणे, मिरवणुका, युनियनच्या कामांमध्ये सहभागी होणे इ. कामे ते अत्यंत निष्ठेने करत. शाहीर अण्णा भाऊ साठे, अमर शेख, गवाणकर इत्यादींच्या कलापथकांमध्ये सहभागी होत त्यांनी 1956ला त्यांचे प्रथम गीत ‘डोंगरी शेत’ लिहिले. अमरशेखांनी त्याला लोकसंगीतबद्ध करून वस्तीवस्तीत पोहोचविले. तद्नंतर ‘गिरणीची लावणी’, ‘महाराष्ट्राच्या नावानं’ गोंधळ, ‘गाडी आणा बुरख्याची’ गीत, अशी कामगार-कष्टकऱ्यांच्या ‘सर्वहारा’ अवस्थेचे यथार्थचित्रण करणारी गीते सामान्य जनमानसांत गाजली. “श्रम आणि सत्य । सौंदर्याची गाथा सारे झूट मिथ्या । याच लोकी ।” (कॅप्शन कॉमेंट मध्ये सुरू आहे)
#narayansurve #नारायणसुर्वे #poetry #poets #कवी #revolution #revolutionary #क्रांती #क्रांतिकारी
