शिवराम हरी राजगुरू हे स्वातंत्र्यपूर्व भारतात लढत असलेल्या मोजक्या क्रांतिकारी संघटनांपैकी एक असलेल्या ‘हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन’ ,(HSRA) चे महान क्रांतिकारक होते. त्यांचा जन्म 24 ऑगस्ट 1908 रोजी पुणे जिल्ह्यातील खेड या गावात एका सामान्य कष्टकरी कुटुंबात झाला. वयाच्या अवघ्या सहाव्या वर्षी वडिलांचे निधन झाले आणि त्यांचा सांभाळ मोठे बंधू दिनकर यांनी केला. मात्र कुटुंबातील वादामुळे सोळाव्या वर्षी त्यांनी घर सोडले. नाशिक येथे काही दिवस मुक्काम करून ते काशीला पोहोचले. तिथे काही काळ संस्कृत शाळेत शिक्षण घेऊन नंतर त्यांनी एका प्राथमिक शाळेत ड्रिल मास्टर म्हणून काम केले. याच काळात त्यांचा परिचय स्वदेश या साप्ताहिकाचे सहसंपादक मुनीश्वर अवस्थी यांच्याशी झाला आणि ते ‘हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएश’ (HRA) मध्ये सामील झाले. हीच ती संघटना जी नंतर समाजवादी मूल्यांचा स्वीकार करून ‘हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन’ म्हणून ओळखली गेली. भगतसिंह, चंद्रशेखर आझाद, सुखदेव हे त्यांचे क्रांतिकारक सहकारी होते.
लहानपणापासूनच राजगुरूंनी गरिबीचा सामना केला होता. इंग्रजांच्या साम्राज्यवादी सत्तेखालील दडपशाही पाहून कामगार-कष्टकरी सत्तेची आवश्यकता त्यांना जाणवली होती. वैयक्तिक आयुष्यात ते हसतमुख व विनोदी स्वभावाचे होते, मात्र त्याचबरोबर अत्यंत धाडसीही होते. याच धाडसामुळेच सायमन कमिशनविरोधी आंदोलनात ब्रिटिश पोलिसांनी केलेल्या निर्दयी मारहाणीमुळे लाला लजपत राय यांचा मृत्यू झाल्यानंतर सूड म्हणून केलेल्या सॉण्डर्स हत्याकांडात ते सहभागी झाले. खरं तर उद्दिष्ट स्कॉटला ठार मारण्याचे होते, परंतु ओळख चुकल्याने सॉण्डर्स ठार झाला. या कारवाईत राजगुरूंनी जीव धोक्यात घालून सहभाग घेतला आणि नंतर भगतसिंह व आझादसोबत पोलिसांला चकवा देत यशस्वीरीत्या फरार झाले.
अनेक महिने पोलिसांना चकवा दिल्यानंतर सप्टेंबर 1929 मध्ये पुण्यात राजगुरू यांना अटक झाली. त्यांना लाहोरला नेऊन इतर सहकाऱ्यांसोबत तुरुंगात डांबण्यात आले. तुरुंगात त्यांनी आमरण उपोषण केले, न्यायालयाच्या कामकाजावर बहिष्कार टाकला. राजगुरूंच्या उपस्थितीमुळे इतर कैद्यांमध्ये नवीन चैतन्य निर्माण झाले. भारतीय राजकीय कैद्यांना इंग्रज कैद्यांप्रमाणेच वागणूक द्यावी या मागणीसाठी उपोषण करताना डॉक्टरांनी त्यांना जबरदस्तीने दूध पाजण्याचा प्रयत्न केला. या प्रक्रियेत राजगुरूंना व सहकाऱ्यांना अत्यंत हालअपेष्टा सहन कराव्या लागल्या. तरीही त्यांनी आपला निर्धार सोडला नाही.
शेवटी लाहोर कट खटल्यात 24 मार्च 1931 रोजी भगतसिंह, सुखदेव आणि राजगुरूंना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. या तरुण क्रांतिकारकांच्या बलिदानामुळे ते संपूर्ण भारतात लोकप्रिय झाले. जनतेत वाढत चाललेल्या प्रचंड समर्थनामुळे व फाशीविरोधी दबावामुळे ब्रिटिश सरकारने घाबरून 23 मार्च 1931 रोजी फाशी देऊन त्यांची हत्या केली.
आज राजगुरू आणि त्यांचे सहकारी आपल्यात नाहीत, परंतु त्यांचे विचार, त्यांचे बलिदान आणि भारतात समाजवाद स्थापन करण्याचे त्यांचे स्वप्न आजही जिवंत आहे. हे अपूर्ण स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी खरी अर्थाने राजगुरूंच्या विचारांचे वारस असलेल्या आपण तरुणांवर आहे.
शहीद राजगुरू अमर रहे!
इंकलाब जिंदाबाद!
